मेनू...
उपाहार
पोळी-भाजी-आमटी इत्यादी..
गोडधोड

ही पाककॄती इंग्रजीमध्ये इथे वाचा.
ओल्या काजूची उसळ

प्रमाण: ३ जणांसाठी

Cashew Nuts Curry
Tender Cashewnuts

साहित्य:

  • १ १/२ कप ओले काजू (उजवीकडच्या छायाचित्रात सालं काढलेले काजू दाखवले आहेत) (उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत.)
  • २ मध्यम कांदे,
  • ४ लसणीच्या पाकळ्या,
  • ३ हिरव्या मिरच्या,
  • १ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा चिंचेचा कोळ/२ कोकमं,
  • १/४ कप ओलं खोबरं,
  • कोथिंबीर सजावटीसाठी,
  • मीठ,
  • आवडत असल्यास गूळ किंवा साखर,
  • फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल,
  • १ चमचा हळ्द, १/४ चमचा हिंग
  • २ चमचे मोहरी,


कृती:

  1. ओले काजू वापरणार असाल तर थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील.
    (सालं काढणं जरा किचकट काम आहे. पण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी थोडे कष्ट घ्यायला काय हरकत आहे, नाही का? :-) )
  2. सालं काढून काजू पाण्यात स्वच्छ चोळून धुऊन घ्यावेत.
  3. कांदा बारीक चिरावा. लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. मिरच्या चिरून घ्याव्यात.
  4. कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी तडतडू द्यावी. मग हळ्द व हिंग घालावे.
  5. लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसूण लाल होऊ देउ नये. लगेचच कांदा घालून लाल होईपर्यंत परतावा.
  6. मग काजू घालून जेवढी पातळ हवी तेवढे पाणी घालावे. काजू व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण ठेवावे.
  7. आता त्यात गरम मसाला, चिंच/कोकमं, मीठ, गूळ घालावा.
  8. खोबरं घालून ढवळावे.
  9. वर कोथिंबीर पेरून पोळी/भाकरी किंवा भाताबरोबर ओल्या काजूची उसळ वाढावी.

टीपा:

  1. ओल्या काजूच्या चवीला खरंतर तोड नाही. तरीही उपलब्ध नसल्यास सुके, न खारवलेले काजू २ तास पाण्यात भिजवून वापरावेत.
  2. या उसळीत बटाटा छान लागतो.
  3. बदल म्हणून चिंचेऐवजी टॊमेटो घालून बघावा.
  4. काळा मसाला घालूनही ही उसळ चांगली होते.
  5. सालं काढून काजू फ़्रीजर मध्ये ठेवले तर महिनाभर चांगले रहातात.
  6. दुसरी सोपी पद्धत अशी:
    २ टेबलस्पून तेलात १ चमचा मोहरी, १ चमचा हळद आणि १/४ चमचा हिंगाची नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात ३ हिरव्या मिरच्या चिरून घालाव्यात.
    १ १/२ कप काजू आणि पाणी घालून शिजू द्यावे.
    ओला नारळ नुसताच किंवा वाटून घालावा. मीठ, गूळ किंवा साखर घालावी. कोथिंबीर पेरून वाढावी.

    उपासासाठी ओल्या काजूच्या उसळीची पद्धत अशीच फक्त त्यात तेला ऐवजी तूप घ्यावे आणि हळद व हिंग घालू नये.