मेनू...
उपाहार
पोळी-भाजी-आमटी इत्यादी..
गोडधोड
Garlic Chutney

ही पाककॄती इंग्रजीमध्ये इथे वाचा.
लसणीची चटणी - प्रकार १

प्रमाण: साधारण अर्धा कप

साहित्य:

 • १/४ कप सुकं खोबरं ,
 • १ टेबलस्पून तीळ,
 • १/४ कप लसणीच्या पाकळ्या,
 • १/४ कप चिरलेला कांदा,
 • ४ चमचे किंवा अधिक लाल तिखट
 • १ टेबलस्पून भाजून सोललेले शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचं कूट,
 • १/२ चमचा चिंचेचा कोळ,
 • मीठ,
 • चमचाभर तेल,


कृती:

 1. प्रथम एका कढईत सुकं खोबरं तांबुस रंगावर कोरडंच भाजून घ्यावं.
 2. खोबरं वेगळं काढून त्याच कढईत तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजावेत.
 3. कढईत एक चमचा तेलावर लसूण पाकळ्या किंचित म्हणजे सोनेरी होईपर्यंत भाजाव्यात.
 4. मग चिरलेला कांदा भाजावा. छान लाल होऊ द्यावा.
 5. आता सगळे भाजलेले जिन्नस, शेंगदाणे किंवा दाण्याचं कूट, चिंच, लाल तिखट, मीठ हे एकत्र खलबत्त्यात कुटावं.
 6. खलबत्ता नसेल तर चॊपर किंवा मिक्सर वर चटणी भरड वाटून घ्यावी.

 7. कुठल्याही जेवणाची लज्जत वाढवणारी आपली मराठमोळी लसूण चटणी... मग बरोबर पोळी असो नाहीतर भाकरी, घावन, डोसे किंवा साधा आमटी भात. हमखास भाव खाऊन जाते!

टीपा:

 1. या चटणीत सगळे जिन्नस भाजलेले असल्याने चवीला नेहमीच्या लसणीच्या चटणीपेक्षा जरा वेगळी पण मस्त लागते.
 2. लसूण चटणी सॅंडविचेसमध्ये वापरली तर छान चव येते.
 3. बदल म्हणून चिंचेऐवजी लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घालून बघावी.
 4. थोडं जिरं भाजून चटणीत घालावं.
 5. आवडत असेल तर चटणीत साखर घालावी.
 6. ही चटणी १५ दिवस तरी छान टिकते.