मेनू...
उपाहार
पोळी-भाजी-आमटी इत्यादी..
गोडधोड
Mix Vegetable Kurma

ही पाककॄती इंग्रजीमध्ये इथे वाचा.
मिश्र भाज्यांचा कुर्मा

प्रमाण: ५ माणसांसाठी

साहित्य:

 • १/२ गडडा फ्लॊवर ,
 • २ मोठे बटाटे,
 • ३ गाजरं,
 • मटार दाणे पाऊण कप,
 • १ मोठा कांदा किंवा ४ छोटे कांदे
 • २ मध्यम आकाराचे टॊमेटो
 • १ १/२ चमचा गरम मसाला
 • १ १/२ चमचा आलं-लसूण-हिरवी मिरची वाटून,
 • १/४ कप सुकं खोबरं,
 • लाल तिखट (प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावं.)
 • १ चमचा हळद
 • २ चमचे जिरं,
 • मीठ
 • ३ टेबलस्पून तेल


कृती:

 1. प्रथम फ्लॊवर चे मोठे तुरे काढावेत व धुऊन घ्यावेत. बटाट्याच्याही साधारण १ इंचाच्या फोडी कराव्यात. गाजर सोलून त्याचे लांबट तुकडे करून घ्यावेत.
 2. सुकं खोबरं तांबुस रंगावर भाजून त्याची पूड करावी.
 3. कांदा-टॊमेटो बारीक चिरावेत.
 4. एका पातेल्यात तेल चांगलं तापलं की त्यात जिरं तडतडू द्यावं. मग कांदा घालून चांगला लाल होईपर्यंत परतावा. बाजूने तेल सुटू लागलं की त्यात टॊमेटो घालून परतावं. अजून तेल सुटेपर्यंत परतत रहावं.
 5. आता त्यात आलं-लसूण-मिरचीचं वाटण घालावं आणि थोडंसंच (अर्धा मिनिट) परतावं.
 6. फ़्लॊवर, बटाटा, मटार, गाजर या सगळ्या भाज्या घालाव्यात. पाऊण भाज्या बुडतील इतपत पाणी घालावं. झाकण ठेवून मध्यम आंचेवर भाजी अर्धी शिजू द्यावी (साधारण १५ मिनिटं).
 7. झाकण काढून गरम मसाला, लाल तिखट, सुकं खोबरं, मीठ घालून भाजी नीट ढवळावी आणि सर्व भाज्या पूर्ण शिजेपर्यंत (गाळ होऊ न देता) गॆसवर ठेवावी. वाढताना कोथिंबिरीने सजवायला विसरू नये.

 8. गरम पोळी, फुलका, भाकरी, पुरी, पराठा किंवा जिरा राईस बरोबर अप्रतिम लागते. आणि जोडीला कच्चा कांदा!

टीपा:

 1. आवडत असल्यास फरसबी, मक्याचे दाणे आणि/किंवा पनीरही घालून बघावं.
 2. या भाजीला दुसरा कुठलाही गरम मसाला घालून बघायला हरकत नाही.(पण वरती जी लिंक दिली आहे त्या मसाल्याने छानच स्वाद येतो.)