मेनू...
उपाहार
पोळी-भाजी-आमटी इत्यादी..
गोडधोड
Vegetable Burger
ही पाककॄती इंग्रजीमध्ये इथे वाचा.

वेजिटेबल बर्गर

प्रमाण: ८ ते १० बर्गर्स

साहित्य:

 • २ मध्यम आकाराचे बटाटे,
 • १/४ कप कुस्करलेले पनीर किंवा मऊसर टोफु,
 • १/४ कप बारीक चिरलेला किंवा किसलेला कोबी,
 • १/४ कप बारीक चिरलेली फरसबी,
 • २ गाजरं,
 • १ कप पालकची पानं,
 • १/४ कप मटार दाणे,
 • १/४ कप मक्याचे दाणे,
 • २ चमचे प्रत्येकी आलं आणि लसूण वाटून,
 • ४ हिरव्या मिरच्या वाटून,
 • १ चमचा गरम मसाला,
 • १ चमचा किचन किंग मसाला,
 • १/२ चमचा चाट मसाला,
 • थोडी कोथिंबिर चिरून,
 • मीठ चवीप्रमाणे,
 • पावाचा चुरा एकसंध मिश्रणासाठी,
 • तव्यावर परतायला किंवा तळायला तेल,

 • बर्गर चे बन्स,
 • लेट्युसची पानं किंवा पालकची पानं,
 • टॊमेटो आणि कांद्याच्या चकत्या,
 • बटर किंवा तेल बन्सना भाजण्य़ा आधी लावायला,
 • चीजचे स्लाईसेस,
 • स्प्रेड बनवण्यासाठी: मेयोनेज आणि केजन सिझनिंग किंवा लाल तिखट,


कृती:

 1. बटाटे उकडून मळून घ्यावेत.
 2. गाजर किसून घ्यावे. चिरलेला कोबी आणि फरसबी वेगवेगळे मायक्रोवेव किंवा कुकर मध्ये लगदा होऊ न देता वाफवून घ्यावेत.
 3. मटार आणि मक्याचे दाणे ताजे असतील तर वाफवून घ्यावेत.
 4. पालकची पानं गरम पाण्यातून काढून पिळून घ्यावीत, मग बारीक चिरून घ्यावीत.
 5. बटाटे, पनीर किंवा टोफु, कच्चे गाजर आणि वाफवलेल्या भाज्या हे सर्व एकत्र करावे.
 6. एकीकडे खोलगट तवा तापवत ठेवावा.
 7. आता मिश्रणात वरील सर्व मसाले घालावेत. तांदळाचे पीठ किंवा पावाचा चुरा मिश्रण एकसंध होईल इतपतच घालावे.
 8. तेलाच्या हाताने मिश्रणाचे गोळे करावेत व तळहातांमध्ये दाबून चपटे करावेत.
 9. तव्यावर जरा जास्त तेल सोडावे. पावाच्या चुर्यात प्रत्येक पॅटी घोळवावे व असे सर्व पॅटीस तयार करून तव्यावर रचावेत.
 10. सर्व पॅटीस दोन्ही बाजूंनी कुरकुरीत व सोनेरी रंग येईपर्यंत तव्यावर परतावेत. एका टिश्युपेपरवर काढावेत म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.
 11. स्प्रेड बनवण्यासाठी मेयोनेज मध्ये एक चमचा केजन सिझनिंग घालून नीट ढवळावे.
 12. बन्स च्या दोन्ही अर्धगोलाना आतून बटर किंवा तेल लावून ते ओवन, ग्रिल किंवा तव्यावर थोडे लालसर रंगावर भाजून घ्यावेत.
 13. तळच्या अर्धगोलावर एक किंवा दोन लेट्युसची पानं, टॊमेटो आणि कांद्याच्या चकत्या रचाव्यात. त्यावर एक पॅटी ठेवावे. वर चीजचा स्लाईस ठेवावा. आणि दुसरा अर्धगोल त्यावर ठेवून टॊमेटो केचप बरोबर आस्वाद घ्यावा.
  बरोबर ज्यूस किंवा कुठलेही शीतपेय बहार आणते.

टीपा:

 1. पाव कप शिजवलेला भात घातल्यास पॅटीस कुरकुरीत होतात.
 2. मोड आलेली कडधान्य घालून सुद्धा पॅटीस मस्त होतात.
 3. पॅटीस नुसती तव्यावर परतण्याऐवजी तळूनही घेतलेली चालतात. त्यासाठी मैदा किंवा तांदळाच्या पिठात थोडे पाणी घालून पातळ मिश्रण बनवावे. त्यात पॅटीस बुडवून मग पावाच्या चुर्यात घोळवून भरपूर तेलात तळावेत.