मेनू...
उपाहार
पोळी-भाजी-आमटी इत्यादी..
गोडधोड
Shortbread Cookies
ही पाककॄती इंग्रजीमध्ये इथे वाचा.
शॉर्टब्रेड कुकीज

प्रमाण: फोटोत दाखवलेल्या साईजच्या ९ त्रिकोणी कुकीज

साहित्य:

 • १ कप मैदा,
 • १/३ कप तांदळाचं पीठ,
 • १/४ कप + १ टेबलस्पून बारीक साखर,
 • १/२ कप मऊसर लोणी ,
 • चिमूटभर मीठ,
 • थोडी साखर वरून भुरभुरायला,


कृती:

 1. ओवन ३१५ डिग्री फॅरेनहाइट (१६० डिग्री सेल्सिअस)ला तापवत ठेवावा.
 2. दोन्ही पिठे एकत्र करून चाळून घ्यावीत.
 3. लोणी आणि साखर एकत्र करून इलेक्ट्रिक मिक्सरने हलके होईपर्यंत फेसून घ्यावे.
 4. त्यात मीठ व मैदा आणि तांदळाच्या पिठाचे मिश्रण घालावे. घालताना मधून मधून ढवळावे.
 5. मिश्रणाचा एकत्र गोळा करून एका प्लास्टिक रॅप मध्ये गुंडाळून २० मिनिटे फ़्रीजमध्ये ठेवावा.
 6. २० मिनिटांनी काढून एका बेकिंग शीट्वरच ठेवून हातांनी दाबून किंवा लाटून साधारण ८ इंच व्यासाची व अर्धा सें.मी. जाडीची पोळी बनवावी.
 7. पोळीचे ९ त्रिकोण होतील अश्या मध्यावरून कडेपर्यंत खाचा पाडाव्यात. वरील पॄष्ठभागावर काट्या चमच्याने ठिकठिकाणी टोचावे.
 8. फार उत्साह आणि वेळ असेल तर कडांना बोटांनी दाबून छान डिझाईन करावं. वरून साखर भुरभुरावी.
 9. तापलेल्या ओवन मध्ये ३० मिनिटे हलक्या सोनेरी रंगावर पोळी भाजून घ्यावी.
 10. गरम असतानाच सुरीने खाचा पाडलेल्या जागीच अलगद कापून त्रिकोणी तुकडे करावेत. गार झाल्यावर कुकीज खुसखुशीत होतात.
 11. हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

टीपा:

 1. यात हवं असल्यास १ चमचा व्हॅनिला इसेंस किंवा वेलची पावडर घालावी.
 2. मिश्रणाचा गोळा कोरडा वाटत असेल तर १ चमचा दूध घालावे.
 3. या कुकीज फक्त त्रिकोणीच नाही, तर हव्या त्या आकाराच्या करता येतील.